सुखकर्ता दुख:हर्ता🙏


- सौ. स्वरूपा कुलकर्णी


     श्रीगणेश ही सकल विद्या, कला आणि सद्बुद्धीची देवता आहे. तिची उपासना ही मनुष्यमात्रांसाठी अत्यंत महत्वाची उपासना आहे. कारण, मनुष्य कितीही मोठा, श्रीमंत असला तरी सद्बुद्धी नसेल तर दोन्ही डोळे असून आंधळ्यासारखी अवस्था होते. म्हणजेच शक्ती व ऐश्वर्य असुनही माणूस सद्बुद्धीविना लंगडाच रहातो. आजची सामाजिक परिस्थिती ही अशिच विचीत्र परिस्थिती आहे. वैचारिक गोंधळात सत्य काय असत्य काय किंवा चांगले काय व वाईट काय याचा बोध सामान्य माणसाला होत नाहीये.वैचारिक मतभेदांचा महापूर आलाय. माणूस पैसा ढीग कमावतोय पण मनःस्वास्थ्य हरवलंय. माणूस मनुष्यत्व हा त्याचा पहिला धर्म विसरून कमालिचा यांत्रिक आणि एक्कलकोंडा होत चाललेला आहे. आधुनिक जगाची समस्या ही आहे की सगळं असून हातात काहीच नाही. म्हणजे सर्व आधुनिक संसाधनांनी परिपूर्ण असुनही माणूस मनावर अधिराज्य मिळवू शकलेला नाही, तो मनाचा गुलामच आहे. मन विकांरांनी भरलेलं आहे, बुद्धीला ग्रहण लागलेलं आहे आणि शरिर कमजोर होत चाललेलं आहे. ही परिस्थिती सुखोपभोगाच्या नादी लागून तयार झालेली मनुष्याची स्वनिर्मित "दुःखाची" अशी कहाणी बनलीये. 

     जग वेगाने बदलतंय. वातावरणात अनेक बदल होताहेत. पर्यावरण असंतुलित होत आहे. अशा सगळ्या अंतर्बाह्य अराजकतेच्या काळात मनुष्य भक्कम आधारासाठी तळमळतोय. "सुख पहाता जवापाडे, दुःख पर्वता एव्हडे" अशी दारूण अवस्था आहे.

    अशा या काळात विघ्नहर्ता गणेशाचे पूजन ही अतिशय सकारात्मक व मनोबल वाढवणारी उपासना असेल. या १० दिवसात व एरविही गणेशाची उत्तम आराधना केल्यास गणेश सर्व विघ्नांचे निवारण करून मनुष्याला मनोबल, सद्सद्विवेक, सकल कला,श्रवणीय संगित यांचे देणे भरभरून देईल.. जग ज्या दोलायमान व अतिशय संघर्षातुन वाट काढतंय त्यात सर्व मनुष्य जातीला भगवंताला शरण जाऊन त्याची मनोभावे उपासना करणे हे जरूरीचे आहे. गणेश ही देवता अत्यंत प्रभावी देवता आहे त्याची उपासना करणे हे सर्व लाभदायक व शांती, तुष्टी-पुष्टीदायक ठरते हे भक्त जाणतात. या गणेशोत्सवात सर्वांनी गणरायाची निर्मळ व श्रद्धायुक्त अंतःकरणाने भक्ती करावी व ईप्सित साद्ध्य करावे. 

   चला तर मग गणरायाला    " सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची" असे आर्त भावाने विनवूया.. 

    

  गणपती बाप्पा मोरया।मंगलमुर्ती मोरया।

Comments

Popular posts from this blog