जय सद्गुरू🙏🏻


 सौ स्वरूपा कुलकर्णी


    सद्गुरू ही साधकाच्या जीवनाला पूर्णत्व देणारी माऊलीच असते. प्रपंच करणाऱ्याला त्याचे जन्म देणारे माय बाप हे सर्वस्व वाटतात. पण साधकावस्थेत सद्गुरू हेच साधकाचे खरे माता पिता असतात. सद्गुरूंच्या वात्सल्याने साधकाचे सर्व पोषण होते. साकुरीत सद्गुरू श्रीउपासनी बाबांच्या मायेच्या छत्रछायेखाली अनेक कन्यांनी आपले साधक जीवन समर्पित अवस्थेत जगून जगासमोर खूप मोठा आदर्श ठेवला आहे. 

       अशा समर्पित कन्यांपैकी श्री कन्याकुमारी सती गोदावरी सती लीला ताई यांचे  स्मरण होते. त्यांनी देह ठेवला व त्या सद्गुरूचरणी लीन झाल्या. त्यांना प्रत्यक्ष बघता आले, सहवास घडला हे मी माझे सौभाग्य समजते.

          सती लीलाताई या श्री उपासनी बाबांच्या शेवटच्या सत्शिष्या.श्री बाबांनी स्वतः देहावस्थेत असताना ज्या शिष्यांना अनुग्रह दिला त्यापैकी सती लीलाताई या अतिशय चिकाटी, समर्पित वृत्ती, गुरूगृही कठोर परिश्रम, साधकाची त्यागवृत्ती, विवेक वैराग्य, तप, अध्यात्मिक ग्रंथांचे पठण व तीव्र स्मरणशक्ती ह्या सद्गुणांची खाणच होत्या. त्यांना पाहून श्री बाबांनी  आपल्या सर्व शिष्यांसाठी जो दुर्गम परंतू अत्यंत श्रेयस्कर मार्ग आखून ठेवला त्यावरून चालण्याची हिम्मत, समर्पित वृत्ती त्यांच्याठायी काठोकाठ भरलेली होती. त्यांच्या सात्विक व सत्वशिल तेजस्वी चेहऱ्यावर नजर खिळून रहायची. त्या स्थानात समोर दिसल्या की आपोआप पावले तिकडे वळायची व मस्तक आपोआप झुकायचे. ते झुकायचे तेंव्हा सवयीने स्वतःकडे मोठेपणा न घेता सुहास्य करत"जय सद्गुरू" म्हणायच्या. त्यांचा स्वभाव त्यांच्या प्रेमळ डोळ्यात डोकवायचा. सर्व येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांविषयी आत्मियता प्रेम होते ते नेहमी जाणवायचे. एकदा मी व राणी त्यांच्याकडे गोपीगीत ऐकण्यासाठी गेलो. त्यांनी अतिशय प्रेमाने आम्हाला जवळ बसवून श्री मद्भागवतातील  गोपीगीत अर्थासह समजावून सांगितलं. त्यावेळी त्यांचे वय ९२ वर्षांचे होते. त्याही वयात त्यांच्या तीव्र स्मरणशक्तीचा आम्हाला साक्षात्कार झाला. मी माझ्या वहीत जमेल तसं ते गोपीगीताचा अर्थ व त्यातले कठिण शब्दांचे अर्थ लिहून घेतले. त्यांच्या स्वच्छ उच्चारातून डोळ्यासमोर आख्खं गोकूळ वृंदावन डोळ्यासमोर उभारलं गेलं. संध्याकाळी आपलं सर्व गोधन परत वृंदावनात घेऊन येणारा धुळीने काळा झालेला गोपाल कृष्ण व त्याला त्याही अवस्थेत प्रेमाने पहाणाऱ्या व त्याची थट्टा करणाऱ्या त्या गोपी लीलाताईंनी मोठ्या खूबीने आमच्या डोळ्यासमोर साकारल्या. अगदी सहज आम्हाला तो सत्संग घडला व गोपीगीताचं अमृतपान करता आलं. सच्चा भगवद्भक्तंच देवाचं यथायोग्य वर्णन व त्याच्या लीलांचं सखोल वर्णन करू शकतो. त्यांनी त्या मोजक्या वेळेत आम्हाला गोपी काय व कृष्ण काय हे समजावून दिले. 

       आज हा प्रसंग डोळ्यासमोर आला तेंव्हा असं वाटलं लीलाताई ह्यासुद्धा कृष्णाची कोणी गोपीच होत्या का? किती भगवत्प्रेम , किती श्री बाबांविषयीचा आदर व निष्ठा!! सहज सुंदर भक्तीचा व साधनशुचीतेचा आदर्श त्या होत्या. मी व माझ्यासारखे सर्व साधक भक्त अतिभाग्यवान की अशा तपोनिधी व साध्वी सत्शिष्या आपण जवळून पाहिल्या , त्यांचे आशिर्वाद मिळवले. 

    लिहिण्यासारखे खूप आहे पण  हा लेख मोठा होईल म्हणून लेखनमर्यादेमुळे इथेच थांबते व सती लिलाताईंना शतशः वंदन करते. 

  ।।   जय सद्गुरू।।

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न