#प्रवास

#म्हैसूर 

#आठवणी 

     लेख क्र २

    

- सौ. स्वरूपा कुलकर्णी


       बॅंगलोरचा प्रवास संपवून आम्ही पुढील प्रवासाला निघालो आणि कारने आम्ही म्हैसूरकडे प्रयाण केले. म्हैसूरमध्ये सर्वात प्रथम पाहिले ते म्हैसूर पैलेस! मी माझ्या आयुष्यात इतका भव्य दिव्य राजवाडा प्रथमच पहात होते. वास्तूची भव्यता, देखणा परिसर,सुंदर रंगसंगतींचे घुमट सगळंच सुंदर. राजवाडा बाहेरूनच इतका विशाल व सुंदर आहे की पहाणारा प्रेमातच पडतो. आतुन पहातांना भारतातील विविध धर्मांची छाप त्या कलाकृतींवर दिसून येत होती. विविध कलाकृती, सुंदर दरवाजे, आतिल भव्यता, झुंबर तर केवळ अप्रतिम असे..सगळं डोळ्यात साठवत तिथले खांब पहात व एकुणच वास्तुतील वैभव पाहून मन तृप्त झाले. तिथे बाहेर इतर नवख्या जोडींप्रमाणेच आम्हीही तिथल्या कॅमेरामनकडून फोटो काढून घेतला व एक अनोखी आठवण त्या फोटोत कैद झाली.

       नंतर म्हैसूरचे अतिशय प्रसिद्ध वृंदावन गार्डन पहाण्याचा योग आला. अप्रतिम लाईट फाऊंटेन अर्थात रंगीत कारंज्यासाठी प्रसिद्ध असलेले हे गार्डन पहातांना व नवऱ्याचा हात हातात घेऊन सुखद वातावरणात फिरतांना वेळ कुठे गेला कळलेच नाही.रम्य वातावरणात खरंच मन अगदी ताजेतवाने झाले.हे संपूर्ण गार्डन पहाणे खरंतर अवघड आहे कारण वेळ व चालण्याची हौस असेल तरच ते शक्य अन्यथा नाहीच.दुसऱ्या दिवशी चामुंडेश्वरी टेंपलला जाण्यासाठी निघालो.आम्ही चामुंडेश्वरी हील चढून अतिशय भव्य अशा दक्षिणी पद्धतीच्या विशाल मंदिरासमोर येऊन थांबलो.मंदिराचा भव्य परिसर व गाभाऱ्यात जातांना दक्षिणेतील मंदिरांची विलक्षण स्वच्छता व पावित्र्य जपलेलं पाहून आपल्या इकडील मंदिरांची आठवण झाली.तो विचार झटकून मंदिर परिसर न्याहाळत राहिलो. गर्दी जास्त नसल्यामुळे गाभाऱ्यात देवीची मुर्ती जवळून बघता आली. विविध अलंकारांनी, सुंदर सुंदर कमळ फुलांनी व नेसवलेल्या भरजरी साडीनी चामुंडेश्वरी देवीचे रूप खूलून दिसत होते.चंड-मूंड  राक्षसाचा वध करणारी  तसेच महिषासुरमर्दीनी ही चामुंडेश्वरी पाहून विलक्षण समाधान झाले.परिसरात महिषासुराचीही भव्य मुर्ती पहायला मिळाली.खरंतर दर्शन छान झाले पण देवीच्या मंदीरातील पुजाऱ्यांची पैसे मिळवण्यासाठी चाललेली कसरत पाहून वाईट वाटले.नको म्हंटले तरी देवीचे कुंकू देतो, प्रसाद देतो दान द्या म्हणून पैसे लुटण्याचे विविध मार्ग तिथले पुजारी बिनदीक्कत करत होते. भारतातल्या जवळपास सर्वच  मोठ्या मंदिरात हा लुटमारीचा धंदा बिनदीक्कत चालू आहे. ही गोष्ट खरंच मंदिरातले पावित्र्य घालवते व भाविकांना चिड आणते.त्यामुळे मंदिरात जास्त रेंगाळलो नाही आणि पुढील प्रवासाला लागलो.

        भेटू नविन लेखासह..

क्रमश:

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न