मोक्षदायीनी एकादशी

।।श्री राम।।   ।।श्री कृष्ण।।


- सौ. स्वरूपा कुलकर्णी


   आज गीताजयंती.तसेच मोक्षदा एकादशी. अतिशय पवित्र दिवस. भगवंताने आजच्या दिवशी गीता सांगितली  म्हणून हा दिवस खास आहेच पण एकादशी असल्यामुळे उपवासही घडतो म्हणून अजुन खास आहे. आजचा दिवस तसेच इतरही एकादशींना जाणवणारी महत्वाची गोष्ट म्हणजे एकादशीचा उपवास हा तन व मन दोन्ही शुद्ध करतो.हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.आज  सकाळी उठून मुलींचं आवरलं नी त्या शाळेत गेल्या. मग स्वतःचं आवरून देवपूजेला बसले. आज एकादशी म्हणून देवाला उद्वार्चन केले. सुगंधी शिकाकाईने व गरम पाण्याने स्नान घातले. सुगंधी उदबत्तीने वातावरण आधीच प्रसन्न झाले होते. तोंडाने श्री राम जय राम जय जय राम चा जप करत देवाला दुधाने स्नान घातले. परत स्वच्छ पाण्याने स्नान घातले. वस्त्राने पुसून देव जागेवर ठेवले , फोटोंचीही पुजा झाली. माझ्या देवघरात कुलदेवत खंडोबा व वणीची देवी आहेत. तसेच, गणेश व इतरही देव आहेत. पण सर्वात जिव्हाळ्याचं नातं आहे ते रामाशी. गोंदवलेकर महाराज सांगतात तसं मी रामाशी सर्व नाती जोडली आहेत. वडिल, पती, बाळ, मित्र, आई, देव अशी अत्यंत लाडकी नाती त्याच्याशी जोडून मन फार फार उल्हासीत होतं.त्याच्याशी मनातुन संवाद साधायचा  आनंदच वेगळा. त्याचा सुंदर साजिरा गोजिरा फोटो पाहून मनात फार सात्विक विचार येतात. मन हलकं हलकं होतं व त्याला बघून स्तुती केल्याशिवाय रहावत नाही. तो आहेच मुळात भक्तवत्सल, करूणामुर्ती, आनंदघन राम! माझं भाग्य थोर की त्याच्याशी डोळ्यांनी बोलता बोलता पूजनाचा आनंद वाढत असतो. नित्यपूजा वेगळाच आनंद देते. राम मनातलं सगळं वाचतो व समजतो पण उतावीळ प्रतिक्रीया कधी देत नाही फार संयत प्रतिक्रीया देतो. सहज हसतो पण तेही गोड. त्याच्या रूबाबदार, सर्वांगसुंदर रूपाची मोहिनी पडणार नाही ती व्यक्ती भक्तंच कसली, नाही का.. तो पाहून मन पुनः पुन्हा स्वतःच्या भाग्याची प्रशंसा करतं..असं रोजच भावविभावांचं आवर्तन चालूच असतं. आज आरतीत युगे अठ्ठावीस ही आरती आवर्जुन म्हणाले ऐकून रामाची मुर्ती अधिकच प्रसन्न वाटली. घनश्याम, निळा साजिरा पाहून मनाची कळी मात्र खुलली. नेहमीची पूजा अधिकच रम्य बनली. मग विष्णूसहस्त्रनाम, साई स्तवनमंजिरी वाचली. प्रसन्न मनाने राम व देवाचे दर्शन घेऊन मुरलीधराच्या मंदिरात दर्शनाला गेले. ते मंदिर पवित्रच आहे पण आज अधिक पवित्र वाटलं.तेथे तुपाचा दिवा लावला. अधिकच सात्विक वातावरण झाले. तेथिल गाय व बैल पाहून व त्यांच्या गळ्यातील घंटेचा मधुर नाद ऐकून खूप छान वाटले. मुरलीधरासमोर गीतेतील पंधरावा अध्याय म्हंटला. त्याला प्रार्थना केली व सुहास्य मुद्रेने बाहेर पडले. घरीआल्यावर श्री दासबोधावरील प्राज्ञ परिक्षेचा स्वाध्याय पूर्ण सोडवला. ते लिहीतांना गीतेच्या अधिक जवळ आले. जणू समर्थांनी बोट धरून लिहून घेतले व गीतेचाच गुढार्थ समजावून दिला.

          राम व कृष्ण हे हिंदू धर्माचे प्राण आहेत असं म्हंटलं तर वावगं नाही. दोन्हींच्या भक्तीत प्रेमरस अतिशय दाट आहे. मन एकदा राममय किंवा कृष्णमय झालं की मनाचाही रंग गहिरा होतो. त्यांच्यासारखाच निळा सावळा होतो. हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. कितीतरी प्रश्न,ताण,चिंता सहज सुटून जातात व आपण मोकळे हलके होतो. राम सच्चिदानंदघन आहे, परमात्मा आहे पण त्याच्याशी संवाद साधणं कधिही क्लिष्ट नाही. फार सहज सोपं आहे. तो भक्तांचा चाहता आहे. लाडका आहे आणि फार सच्चा आहे. त्याचा विचार करत करत रामायण कधी समोर उभं रहातं कळतही नाही. राम जसा तसा श्यामही सहजसुंदर, भक्तिप्रेमाला आसुसलेला. प्रेमी व रसिक देव. रामाला व कृष्णाला पाहून सर्व मनोकामना पूर्ण होतात हे खरंय. तो इच्छा स्वतःकडे वळवतो थोडक्यात आपल्या ह्रदयात उतरतो. मग काय मनही तिथेच ठाण मांडून बसते. रामकृष्ण ही दोन डोळ्यांची आस बनते, प्रार्थना बनते. तो मुग्धं हसरा सुंदर पुरूषोत्तम भगवंत खऱ्या भक्तीचा प्यासा आहे. राधा प्रिय तसा हनुमंत प्रिय आहे. अर्जुन प्रिय तसा लक्ष्मण प्रिय. 

        प्रेमाचा भक्तीचा चाहता राम व श्याम..त्यांच्यापूढे नतमस्तक झालं की चिंता रहातच नाहीत. मन शांत होतं. जणू आपल्या विचारांचं, चिंताचं ओझं त्याच्यापुढे मोकळं होतं. राम लवकर भेटो म्हणून मन आसुसलंय व आजही त्याला प्रार्थना केलीये. तो सुप्रसन्न हसलाय.खरंच आज ही मोक्षदायिनी एकादशी सुफल संपूर्ण झाली.


।।श्री रामार्पणमस्तू।श्री कृष्णार्पणमस्तू।।

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न