राममय होऊ सगळे..
-सौ.स्वरूपा कुलकर्णी
राम ही दोन अक्षरांची जादू किती अद्भूत आहे हे आपण सगळे रोज अनुभवत आहोतच.राम ही देवता जनमानसात एव्हडी लोकप्रिय व लाडकी का आहे ह्याचा थोडा खोलात जाऊन विचार केला तर असं लक्षात येतं की रामाचे चरित्रच इतकं सकस , इतकं ह्रदयाला भिडणारं आहे की जनमानसात त्याने निर्माण केलेला आदर्श आजही व उद्याही अंतिम शिखरटोक आहे.हे टोक म्हणजे न्यायाचं, नीतीचं, पराक्रमाचं, सहिष्णूतेचं, प्रेमाचं, मानवतेचं,दिव्यत्वाचं परमोच्च बिंदू स्थान आहे.राम नाम घेणे सोपे पण आचरण रामासारखं असायला आपल्याला किती सायास करावे लागतील? मला तर ते सर्वथा अशक्यच वाटतं...
राम म्हणता म्हणता राममय व्हावं, भक्ती प्रेमाने त्याचं जीवलग होऊन जावं अशा भावना मनात उचंबळत असतात..राम कथा ऐकतांना तर अश्रूंची संततधार लागते.बालवयात अनेक सुंदर लीला करणारा राम,भावंडांवर विशेष माया व प्रेम करणारा सालस राम,लहान वयातच गुरूगृही जाऊन वेद वेदांत ग्रहण करणारा राम,लहान वयातच विश्वामित्रांच्या आदेशानुसार निर्भिडपणे वनात जाणारा राम, सीता स्वयंवरात अत्यंत नम्रतेने गुरू आज्ञेनुसार शिवधनुष्य सहज भंग करणारा राम, अत्यंत शालीनतेने सीतेशी प्रेम अनुराग व्यक्त करणारा राम, स्वतःसोबत आपल्या इतरही भावांचे विवाह व्हावे म्हणून विश्वामित्रांकडे विनंती करणारा रघुत्तम राम, कौशल्याने परशुरामांसारख्या तपस्वींशी विनम्र संवाद साधणारा श्रेष्ठ क्षत्रिय राम,विवाह पश्चात परत अयोध्येत येऊन आपल्या परिवाराशी अत्यंत प्रेमाने वागून समाधान देणारा राम... इथपर्यंतचे सर्व प्रसंग त्याच्यातील गुण कथा श्रवण करणाऱ्याचे मन सूखसंवेदनांनी भरून जातात..आणि मग राम राज्यभिषेक न होऊ देता कैकयीचा विलाप.. राम वनवास ....इथून पुढचे प्रसंग सच्च्या राम भक्ताला दुःखाच्या वेदनांच्या पुरात भावविभोर करून एकटं सोडून देतात..काय भोगलं संवेदनशील, प्रेमळ रामाने..इतक्या कोवळ्या वयात तो आपल्या नवीनच विवाह झालेल्या सीतेसोबत घनघोर वनांमध्ये जातो हा प्रसंगच अत्यंत करूण आहे.राम आधीतर एकटाच वनात जाणार असतो पण सीतेचे पतीप्रेम व लक्ष्मणाचे भ्रातृप्रेम त्याला त्यांना सोबत नेण्यास भाग पाडते..तो क्रूर प्रसंग इतका ह्रदयद्रावक आहे की डोळे , मन , भावना आक्रंदून म्हणत रहातात की राम तुझी कोणतीच चूक नसतांनाही तू वनवासासारखे कटू विष सहज पचवतोस ...खरंच हे किती स्थितप्रज्ञ वृत्तीचे लक्षण आहे.तू तूला राज्यभिषेक होणार म्हणून सुखावलाही नाहीस की वनवास मिळाला म्हणून दुःखीही झाला नाहीस..तुझ्यासारखा तूच! केव्हडी तुझ्या मनाची ताकद की तू कणखरपणे , वज्राहूनही कठीण निर्णय सहज घेतले. सीतेला सोबत नेतांना तुझ्या मनात काय नी किती काळजी निर्माण झाली असेल हे तूझं पतीह्रदयच जाणो जाणे..किती हळवे ते क्षण की माझ्यामुळे माझ्या पत्नीला व भावालाही वनवास भोगावा लागतोय..खरंतर राम कोणत्याही राज्यलोभात अडकणारा पुरूष नाही हे कैकयीलाही माहीत होतेच..पण तीची मतीच फिरली होती , तीचा बुद्धीभेद झाला तीने अत्यंत घृणास्पद आरोप रामावर करून त्याला वनात पाठवण्याचा हट्ट धरला..ही खरंच मानवतेला काळीमा अशीच घटना..कारण त्या काळातील वने ही अत्यंत भयानक राक्षस, निशाचर, नरभक्षक प्राण्यांनी भरलेली स्थाने होती.राम स्वतः हे जाणून होताच.पण म्हणून तो घाबरला नाही की रडला नाही.त्याचे मनोधैर्य असीम होते.त्याचा उच्च पातळीचा विवेक ह्यामुळे वनवासातील कटू प्रसंगातही तो धीराने लढतच राहिला.सत्यासत्य, नीतीअनीती,न्यायअन्याय, या सर्व गोष्टींच्या निवडीत तो नेहमी सत्य, नीती,न्याय यांच्याच बाजूने कौल देत राहिला.रावणासारख्या अत्यंत विद्वान व बलाढ्य शत्रूलाही त्याने न्यायानेच वधले.कधिही अविवेकाने निर्णय घेतले नाही.लंकेचे राज्य स्वसामर्थ्यावर जिंकूनही अत्यंत सहजतेने त्याने ते बिभीषणालाच अर्पण केले.किती विशाल मन..किती संस्कारी , विचारी भूमिका! तिथून परत अयोध्येला येऊनही हनुमंताला जो संदेश त्याने दिला तो तर फार महत्वाचा..हनुमंता, जा बघुन ये की माझा भरत जर राज्यकारभारात रमला असेल तर ते राज्य मी त्याचेच मानेल.मी वनातच राहीन.हनुमंताने भरतभेट घेतली तेंव्हा ते गदगदून रडले की भरताची प्रभूनिष्ठा किती उच्चकोटीची की रामपादूकांजवळ विरक्तपणे राहून तो शत्रुघ्नाकरवी व वसिष्ठांच्या आज्ञेने राज्यशकट चालवतो आहे.थोडक्यात राम वनवासात अख्खा राजपरिवार दुःखाच्या महासागरात कोसळला होता.लक्ष्मण वनात, सीता वनात, दशरथ मरण, तिन्ही राण्या विधवा आणि मुलांच्या व पतीच्या वियोगाने दुःखी, भरत विरक्तपणे भोग विलास दूर करून झोपडीत रहात होता. शतृघ्न अत्यंत दुखी मनाने परिवारातील सर्व स्त्री वर्गाला सांभाळत राज्य पहात होता.केव्हडे त्याग या तरूण मुलांनी केले.राम अयोध्येत नाही म्हणून प्रजाजन किती कठोर,दुःसह दुःख भोगत होते ते तर सांगायलाच नको.कारण राम अयोध्यापती होणार म्हणून अख्खी अयोध्या केवळ त्या वार्तेनेच सजली नटली होती.पण कालचक्राच्या गूढ गतीने सर्वच सुखांवर पाणी पडले..राम,सीता,लक्ष्मण वनवासी झाले..जणू प्रत्येकाच्या जगण्यातला रामच निघून गेलेला हनुमंताने पाहिला..परत येऊन रामासमोर निवेदन केले आणि मग राम अयोध्येत आले.त्यानंतर राम अयोध्यापती झाले..
संपूर्ण रामायण ही मानवाला मिळालेली शिक्षाप्रणालीच आहे.जीवन जगतांना कितीतरी कटू प्रसंगात स्थिर राहून विवेकाने प्रवास कसा करायचा हे अत्यंत तत्वनिष्ठ, न्यायी, प्रेमळ राजा रामाने शिकवले आहे.राम खरंच केवळ त्रेतायुगात झालेला कोणी राजा नाही तर तो या भुमीचा हुंकार आहे.करूणेचा सागर आहे.त्यागमुर्ती आहे.विशाल ह्रदयाने जनमानसात आपली नाममुद्रा उमटवणारा तो काळालाही हरवणारा युगपुरूष आहे..म्हणूनच आज कलियुगातही राम नामानेच आपण तरून जाणार हे त्रिवार सत्य आहे..
पाचशे वर्षांनी रामजन्मभुमीत परत एकदा श्रीरामचंद्रांचे आगमन होत आहे.या अत्यंत भावोत्कट प्रसंगी आपण सर्व मानव समुदाय जुने वाद विवाद नष्ट करून केवळ रामासाठी अत्यंत प्रेमाने व भक्तीने एकदिलाने त्यांचे स्वागत करूयात..हीच रामेच्छा आहे...हीच आपली जीवन ध्येयपूर्ती आहे.रामासाठीच राममय होऊयात व खुल्या दिलाने रामरायांचे स्वागत करूयात..आता एकच नाद घुमू दे,
जय श्री राम।जय श्री राम।।
Comments
Post a Comment