ऋतुरंग
- सौ. स्वरूपा कुलकर्णी
ऋतु बदलला म्हणजे रोज दिसणारी झाडांची, फुलांची, हवामानातील बदलाची जाणीव आपल्याला होते. हे ऋतुरंग मला जणू नववधुने गृहप्रवेश करतांना तीच्या बदलणाऱ्या आयुष्यासारखे सुंदर वाटतात. सुंदर सकाळ अजुनच सुंदर होते.आता हेच बघा ना,सद्ध्या ऋतु बदलतोय हे आपल्याला जाणवतंय. हिवाळा जाऊन उन्हाळ्याकडे झपाट्याने प्रवास होतोय. शिशिर सरून वसंताचे आगमन झाले आहे.निसर्गातील हा बदल विलक्षण देखणा व सुगंधी आहे , कसा ते बघा हं..विविध झाडांच्या हिरव्या पानांतुन आता कोवळ्या पोपटी पानांनी आपलं अस्तित्व दाखवायला सुरूवात केलिये.आंब्याच्या हिरव्या- पोपटी पानांत आता मोहर लगडलाय.आता आंब्याच्या प्रतिक्षेत सर्वजण मोहोर व बाळकैऱ्यांकडे आठवणीने मधुन मधुन लक्ष ठेऊन आहेत. कैऱ्यांची चटणी,तक्कू, लोणची हळूहळू घराघरात दिसू लागलीये. छोट्या बागेतील झाडांवर उन्हामुळे विसावलेले विविध रंगांचे-जातीचे पक्षी दिसत आहेत. नळाजवळ, पाणवठ्याजवळ पक्षी घुटमळत आहेत. तहानलेल्यांसाठी गच्चीवर, गॅलरीत पाण्याच्या छोट्या वाट्याही ठेवल्या जाताहेत. पहाटेच कळ्या उमलून जणू ह्या चांदण्याच वाटाव्यात अशा मोगऱ्याचा श्रीमंत गंध दरवळतो आहे. हिरव्या - पेपटी पेटीतुन पांढऱ्या कळीचे गोजिरवाणे फुल बाहेर पडते तेंव्हा होणारा आनंद केवळ वर्णनातीत..हा ऋतुबदल खरंच फार भावणारा तो या सोहळ्यांमुळेच! हवा उष्ण गरम घराघरात फॅनचा वारा घेणारी मंडळी , वाळवणाची कामे करणाऱ्या गृहिणी, दुपारी सुट्ट्यांमुळे निवांत टिव्ही व कार्टुन बघणारी मुले, विविध कलांचे क्लास करणाऱ्या मुली, आजीचा फावल्या वेळेत चालणारा जप, अशी ही रेंगळणारी दुपार उष्णतेने कधीकधी नकोशी होते. मग हळूहळू पश्चिमेकडे दिवस कलू लागतो व गार वारा शरीरावर फुंकर घालतो. हवा सुसह्य होते मन ताजेतवाने होते..संध्याकाळी रामरक्षा म्हंटली जाते, दिवेलागणी होऊन दिवसाचे मनावर साचलेले ओझे देवासमोर उतरते.रात्र मात्र चांदण्यांची सहल घडवते.मन रेडिओवरील गाण्यात गुंगून जाते. उन्हाळ्यात रात्री जास्त सुंदर होतात. आठवणींचा खजिना उलगडतात.सगळ्या भावंडांसोबत गावामध्ये आजीच्या पांघरूणात ऐकलेल्या गोष्टी नी गमतजमती कायम स्मरणात रहातात.सुट्ट्यांची मामाच्या गावाला जाण्याची मजा मुले आजही घेतात हे बघुन सुखद आठवणी जाग्या होतात. जगण्यावर ज्यांनी मनापासून प्रेम केलंय अशा साहित्यिकांच्या पुस्तकात जीव रमतो. मोगरा तर मित्रच होतो. रात्रीशी नेहमीपेक्षा अधिक हितगुज होते. मित्र मैत्रिणी विविध कार्यक्रमातुन अधिक जवळ येतात.सृजनशील मन जगण्याचा उत्सव करते. हे ऋतुरंग खास ठेवणीतल्या पैठणीच्या पदराइतकेच लहान पण संबंध साडीला सौंदर्य देणारे देखणे व अनोखेच गवसतात.. ऋतु बदल मनही जुनी कात टाकून मोहरते, बहरते व अलवारपणे फुलपाखरू होऊन नवे फुल शोधू लागते... नित्य नवा अध्याय लिहिते..हलकेच विस्मयाने जग अनुभवते..
Comments
Post a Comment