चैत्रगौरीस पत्र
- सौ. स्वरूपा कुलकर्णी
प्रिय गौरी,
तुझ्या शुभागमनाने मन परत आनंदाने बहरून गेले. तुझी पावले माझ्या अंगणातुन घरात उमटली नी मन खरंच टवटवित झाले.सळसळतं चैतन्य घरादाराला आले. किती प्रतिक्षा तुझ्या आगमनाची! ही अवस्था तर दरवर्षीचीच गं.त्या कैलासाधिपती शंकरांना सोडून माहेरी मनसोक्त विश्राम करायला येतेस.माझ्या संसाराला काय हवं काय नको ते पहायला तू येतेस. हिरवी साडी, ठसठशीत कुंकू, लांब वेणी, कमनीय बांधा, नाजूक हात, सुंदर पावले अशी तू सोळा श्रृंगार करणारी गौराई माझ्या घरी विश्रांतीसाठी येतेस.आल्या आल्या सुगंधी तेल लावून,उटणे लावून अभ्यंग स्नान करतेस.त्या तूला स्नान घालतांनाचे तुझे माझे संवाद कितीतरी वेळ चालतात.माझ्या मनोराज्यात तूझे स्वागत होते. तू गोड खिरापत, दुध-साखरेचा नैवेद्य भक्षण करतेस.मी मनोभावे केलेली आरती तू हसतमुखाने स्विकारतेस.गार माठातलं,सुगंधी वाळ्याचं पाणी पितेस, कच्ची कैरी चवीने खातेस, मोगऱ्याचा गजरा केसात माळतेस, सुगंधी अत्तर हौशेने लावतेस. मधुनच घरातल्या पिल्लांवर मायेने नजर फिरवतेस. पंख्याच्या गार हवेत झोपाळ्यावर सहज रमतेस. माझी ख्याली खुशाली विचारतेस. हे तुझं माझ्या घरात रमणं मला भारी आवडतं.
दरवर्षी तू येतेस अगदी माहेरच्या आठवणीने. म्हणूनच तुझा माझा प्रेमभाव वाढतच गेला.अगदी चढत्याक्रमाने. पुर्वी आईकडे असतांना मला बाई तुझं फार अप्रुप होतं. आई कशी तुला आंघोळ घालते, कशी वस्त्र नेसवते, कसं हळदी कुंकू वहाते मी पहात रहायचे. नंतर नंतर हे सगळं मीही करत गेले. आता सासरी आल्यावरही तुझी अखंड सेवा मिळाली. मी धन्य झाले. तूझे मायाळू ,उबदार अस्तित्व महिनाभर का होईना मला आईची माया देते. या सुखात मन तुडूंब भरतं. डोळ्यात अश्रु जमा होतात की तू तर जगाची माता पण लेकराच्या संसाराची किती काळजी तुला. हे भाववेडे बंध तुझ्यात कधीचे बांधलेत गं मी गौराई.
दारी काढलेले चैत्रांगण मी एकटक न्याहाळते. तुझ्या पावलांच्या खुणा पहात रहते. हळदी कुंकू, हिनाचे अत्तर तुला लावून मन शांत होते. महिनाभर राहून शेवटी हळदी कुंकवाला सर्व सख्यांचा मेळा जमतो, सर्वांना गार कैरीचं पन्हं, हरबऱ्याची डाळ, खिरापत, कैरीची डाळ असं सगळं साग्रसंगित करतांना तू आता जाणार याचं एक हळवं दुःख मनात वारंवार डोके वर काढत असते. उत्साहात कुठलीच कमी नसते.तुझ्यासारखी मलाही सख्यांची आवड तुझ्या परिचयाची. सख्यांचा श्रृंगार, साड्या,रंगतदार गप्पा सगळं सगळं मन प्रसन्न करतं. तुझ्या हळदी- कुंकू समारंभासाठी कुठलीही उणीव राहू नये म्हणून धडपडणारी मी पाहून तू मंद मंद स्मित करतेस. मैत्रीणींचे घोळके येतात व घर भरून जातं. तूही सुखावतेस.माझी लाडकी गौरी खूश पाहून मीही गहिवरते. तू आहेसच खास माझ्यासाठी गौराई असं मनात म्हणते. कार्यक्रमाच्या शेवटी जणू तू म्हणतेस "अगं जरा बैस. तूही पन्हं घे. सकाळपासून काम करतियेस. ये जरा बैस माझ्याजवळ",म्हणून खुणावतेस. मग मीही थोडी विसावते. तुझ्याशी संवाद करत पन्हं पिते.तुझी नी माझी समाधानाची नजरभेट होते. कारण सगळं मनाजोगतं पार पडलेलं असतं. तुझे आशिर्वाद मिळालेले असतात. मग मोगऱ्याचा श्रीमंती दरवळ नकातुन मनात पसरतो. तुझी दिव्य मुर्ती मनमानसी साकारते. मी नतमस्तक होते. झोपाळ्यावर झुलणारी तुझी मुर्ती मनात घर करून रहाते. पुन्हा पुढिल वर्षीची वाट पहात मी तुझ्या सजावटीकडे पहात रहाते. तूझा खीर कानोल्याचा नैवेद्य खातांना मन तृप्त होत रहाते. नी तुझी आठवण कायमस्वरूपी ह्रदयात कोरली जाते.माझी लाडाची गौराई..
Comments
Post a Comment