अस्मिता वहिनी..


- सौ.स्वरूपा कुलकर्णी


   आज सहज लग्नातले फोटो चाळतांना हा फोटो दिसला. पाहताच लग्नातले दिवस आठवले. मुळात या फोटोत डावीकडून दुसरी ती माझी चुलत मोठी जाऊ- अस्मिता वहिनी.तिला जाऊन आता ५ वर्षं झाली.तिच्या आठवणीने भुतकाळात गेले.अस्मिता वहिनी म्हणजे माझ्या सासरची सर्वांची लाडकी सून.अतिशय हुशार,कर्तबगार,प्रेमळ अशी सदा हसरी नी बडबडी वहिनी.ती डोंबिवलीत रहायची.

     माझं नविन लग्न झालं तशी लग्नातही तिचा वावर सुखावहं होताच पण लग्न झाल्यावर पहिल्या गृहप्रवेशापासून ते आमच्या जागरण गोंधळांपर्यंत वहिनीची लगबग व उत्साहाने सगळ्या कामात पुढे असण्याचा स्वभाव वाखाणन्यासारखाच होता.

      माझ्या गृहप्रवेशाला तिने केलेली गृहसजावट आजही लक्षात आहे. वहिनीने खास डोंबीवलीहून जर्बेरा, गुलाब, शेवंतीची फुले आणली होती. माप ओलांडतांना मी घेतलेला उखाणा सर्वांना आवडला.तेंव्हा अतिशय आनंदाने सर्वांनी माझ्यावर व सुबोधवर पुष्पवर्षाव केला.आत प्रवेश करताच आपण कोणीतरी सेलिब्रीटी आहोत अशी वागणूक मला मिळाली.नंतरचे ४-५ दिवस घरात तिचा चैतन्यामयी संचार होता. ती तिच्या मनमोकळ्या हसऱ्या स्वभावाने मला  या नविन घरात किती धीर देत होती ते सांगायलाच नको.वहिनी प्रत्येक कामात हुशार!ते जाणवत होते.

  आमच्या पहिल्या रात्रीच्या वेळी घरातली सर्व मंडळी आमची नजर चुकवून कामाला लागलेली होती. सगळेच किती खोडकर आहेत हे मला तेंव्हा कळले. त्या सर्वांनी केलेली जय्यत 😁 तयारी तर विचारायला नको.माझ्या दिराने विशालने रूममधल्या सोफ्यात मोबाईल लपवला होता.फॅनवर फुलं ठेवलेली होती.एक लपवलेली मोटरकार सारखी वाजत होती. अन् हद्द म्हणजे माझ्या दोन्ही नणंदा आमच्या बेडखाली लपल्या होत्या😁. आम्ही दोघं सुरवातीपासूनच जरा दबकतंच खोलीत प्रवेश केला होता.सगळं चेक केलं. काही गडबड दिसली नाही. पण गम्मत पुढे होती.थोड्यावेळाने मी व सुबोध बोलतांना कुणाचा तरी हसण्याचा आवाज आला.अगदी हळूच.पण माझ्या कानांनी मी तो ऐकला.मग काय सगळी रूम धुंडाळून काढली तर बेड खाली ह्या दोघी😀बापरे! मी व सुबोध तर हडबडून गेलो.बाहेर नुसता हास्यकल्लोळ..मी मात्र हिरमुसले.काय बाई चावटपणा(मी मनात )पुढे रात्रभर कधी मोबाईल कधी मोटरकार असे आवाज ऐकतच रात्रं गेली हे सांगणे न लगे😄..पुन्हा सकाळी चिडवायला सगळे समोर हजर!

     वहिनीने हा प्लॅन केला होता हे नंतर कळलं.मला जाम हसायला आलं.सगळीच कोऱ्हाळकर (कुलकर्णी)मंडळी विनोदी स्वभावाची आहे ह्याची झलक मला पहायला मिळाली.

    नंतर देवीच्या दर्शनाची वणी गडाची अविस्मरणीय सहल झाली ..गाडीत वहिनी व विशाल प्रचंड कॉमेडी कविता,गाणी गात प्रवासात खूप खूप हसवत होते. सगळीच मंडळी कधी आम्हा दोघांवर तर कधी सगळ्या म्हाताऱ्या मंडळींवर जोक पे जोक करत होते.अतिशय कम्माल गाणी व जोक ऐकुन मला माझ्या कॉलेजच्या ट्रीपची आठवण झाली.किती गंमतदार ती सहल झाली हे शब्दात मांडता येणं अशक्य आहे.

     हसत विनोद करत ते फुलपाखरू दिवस निघून गेले.आयुष्य रोज नवी वळणं घेत धावत गेलं.मला ओवी झाल्यानंतर वहिनी तिला फ्रॉक पाठवत राहिली.तिचं गुरूकुलमध्ये असल्याने ती कामात अतिशय व्यस्तं असायची.कधी पत्रं फोन करत राहिली.आवर्जुन मला बोलवत राहिली.तिला आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार मिळाला होता.नेहमी फोटो पाठवत राहिली.किती कर्तुत्ववान आपली वहिनी म्हणून कौतुक वाटत राहिले.

     अन् एक दिवस ती बातमी समजली.वहिनीला कॅन्सर आहे नी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट आहे.वहिनीला कॅन्सर होऊन ३ वर्षं झाली होती तरी तिने आम्हाला कळू दिलं नव्हतं.तीचा कायमंच हसरा स्वभाव त्यामुळे आम्हालाही काही शंका आली नव्हती.ती स्वामी भक्तं होती. कॅन्सरशी झूंज देत अखंड लढत राहिली. किती थोडा मला तिचा सहवास लाभला पण ती कायम मनात घर करून गेली.वहिनीने श्रावणी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. ती स्वामीचरणांशी एकरूप झाली. इतकी कामसू, हसरी, प्रेमळ माझी वहिनी आम्हाला सोडून गेली. खरंच तीने किती मने जिंकली. जातांना अनेक आठवणी ठेवून गेली. तीच्या भेटी कमीच झाल्या पण जेव्हडे भेटलो तेव्हडे भरभरून !! वहिनी तुला कधिही विसरू शकत नाही. पुन्हा आपण कधी भेटणार गं? तुला मिठी मारायचीये..तुला परत आमच्यात हसतांना पहायचंय..परत ते सुखसोहळे अनुभवायचेत..वहिनी परत ये ना..Miss you Dear वहिनी♥

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न