...तुझे नक्षत्रांचे देणे
-सौ. स्वरूपा कुलकर्णी
काही माणसं आपल्याला प्रत्यक्ष भेटलेली नसतात पण तरी ती आपल्या जगण्याचा महत्वाचा भाग असतात. तशीच लता आणि आशा! दोघीही किती महत्वाच्या हे सांगता येणार नाही. मागे लता गेली तेंव्हा जसा गाभाऱ्यातला देवच हरवला अशी अस्वस्थता आली, आज तरूण कोवळ्या पालवीला अचानक सुकलेलं पाहिल्यावर जी तगमग होते तशी काहीशी स्थिती झाली. रोजच्या जगण्याला ज्या अमर स्वरांची सवय आहे ते स्वर लताचे नी आशाचेच!
मागे उभा मंगेश गातांना तिची तन्मयता, अभी न जाओ छोडकर म्हणतांनाची शब्दातील ओढ, तरूण आहे रात्र अजुनी म्हणनारी रोमॅंटिक आशा, केंव्हा तरी पहाटे ची लयबद्ध आशा, चांदणे शिंपीत जाशी मधली निळावंती आशा, ऋतू हिरवा मधिल तिच ती नववधू आशा!तिची अप्रतिम गायकी हे स्वर्गसूखच! ती गायली नी निर्जीव वस्तूंनाही नाचावं वाटलं, डोलावं वाटलं, निसर्गही अधिक तरूण वाटला.. ती तारूण्याचा अमर शेला लेवून आलेली स्वरसम्राज्ञी होती. काय नव्हतं तिच्या गायकीत.. रंग, रूप, स्पर्श, रस, गंध ...सगळी ज्ञानेंद्रीय तृप्त करणारं रसायन तिच्या गायनात होतं.सगळी गीतं गातांना ती किती सहज असायची हे पाहून नकळत मनातल्या मनात वंदन केलं जायचं. तिने आयुष्यभर मेहनत, शिस्त याबळावर सूर जपला. ती मनातुन, आत्म्यातून गायली. ऐकणारा प्रत्येकजण त्या स्वरशिंपणात चिंब ओला झाला. जणू ती स्वरमोहिनी त्या प्रत्येकाच्या ह्रदयस्पंदनांवर "आशा" हे नाव गोंदवून गेली. ती प्रत्येकाच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग बनली.
लता गेल्यानंतर ती मोजक्या कार्यक्रमात दिसली पण तितकीच तरूण भासली. जणू या बहिणींना वार्धक्य घेरूच शकत नव्हतं. किती समरसता तिने आपल्या गाण्यातून जपली की गाणं म्हंटलं की लता आणि आशा हिच नाव अग्रक्रमाने येतात. देवाची प्रार्थना असो की निसर्ग गीत असो, प्रणयगीत असो की कॅब्रे गीत असो, पार्टीतही तीच आणि मैफिलीतही तीच! तिची गायन क्षेत्रातील उंची इतकी उच्च जी तिची तिनेच बनवली नी तिथे पोहोचण्याची हिंमत आज किंवा उद्या कोणीही करू शकणार नाही. ती चिरंतन टिकणारा सूर लावून गेली.
दिल चिज क्या है आप मेरी जान लिजीए या गीतातील आर्जव ही इतकी कमाल आहे की दुसऱ्या गायकांनी गायलेलं हे गीत ऐकवतच नाही. तसंच आज जाने की जीद़ ना करो हे गीत ह्रदयाकाशात कल्लोळ निर्माण करतं. किती सुंदर हरकती.. तिचं जानम समझा करो ऐकतांना गाणाऱ्या तिचं वय लक्षातच येत नाही इतका आवाज तरूण! खरंतर ही गोष्ट तिच्या प्रत्येक गीतात जाणवते. गाणी सदैव टवटवीत मोगऱ्यासारखी! जमिनीवर जणू असंख्य मोगऱ्याची फुलं आहेत नी वेचून वेचून हात दुखून जावे नी सहजच हात नाकाजवळ जावा नी मन सुगंधाने काठोकाठ भरून जावं तशी आज तिच्या जाण्याने मनाची अवस्था झाली. तिने आठ दशकं गायलेली असंख्य गाणी त्या मोगऱ्यासारखी मनाला कायम सुगंध देत राहतील..
स्वराशा लुप्त होणे नाही! तू कायमच दैवी स्वरशिल्प आहेस आशा! जन्म मरण ही मर्त्य गोष्टींना लागू होतात तू तर अमर आहेस! मनामनांची " आशा" ..सदैव तरूण "आशा"!!
Comments
Post a Comment