महाशिवरात्री - एक दैवी अनुभव
- सौ. स्वरूपा कुलकर्णी
सर्व देवांमध्ये सर्वात लवकर पावणारा देव म्हणजे महादेव!.. सांब सदाशिव भोळा म्हणून भक्तांना अधिक प्रिय.सर्व पर्वांमध्ये माघ मासातील महाशिवरात्रीचे पर्व हे अध्यात्मिक पर्व असते. संसार सागरात गटांगळ्या खाणाऱ्या प्रत्येक जीवाचा आधार बनते. महाशिवरात्र ही शिवाच्या मंगल, पवित्र लिंगाची शुद्ध भावनेनी बांधलेली पूजा..निर्गुण निराकार शिवतत्व हे परमात्म बीज आहे. तेथे मी- तू पणा न राहाता सारे विश्वच शिवमय होते.ओम् नमः शिवायचा जप केल्याने या अद्वैत अनुभूतीची अत्यंत तीव्र स्वरूपात अनुभूती येते.
आज दुपारी जवळच्याच पंचमुखी महादेवाची जल व दुग्धाभिषेकाने पूजा करण्याची संधी मिळाली. अत्यंत पवित्र स्पंदनात मन शिवरूप झालं..तसेच सायंकाळीही पिंपळसच्या रामेश्वर शिवलिंगाच्या दर्शनाचा योग आला.ही खरोखर शिवकृपाच! बेल- फुल, जल अर्पण करून शिवलिंगाच्या पवित्र व तितक्याच तीव्र स्पंदनामुळे तन मन एकरूप होऊन शिवध्यानात निमग्न झाले.जणू मनातील शुभ संकल्पाला शिवजी त्यांच्या सेवेची संधी देऊन पूर्णत्वाचीच हमी देत होते. मनाने निर्गुण निराकार शिवतत्वावर आत्मा एकाग्र झाला.जवळ गर्दी असुनही बाकी कोणाचीच उपस्थिती विशेष जाणवत नव्हती इतके मन शिवाशी एकरूप झाले होते..ही महाशिवरात्र अतिशय खास ठरली ती शिवाशी अंतरंगातील एकरूपतेमुळेच! मन हर हर शिवध्यानात पुरेपूर डुंबले होते..आज घरी परतण्याची घाई नव्हतीच. जणू काळवेळ थांबूनच गेले होते. आरतीतही तशीच तन्मयता अनुभवास आली. साक्षात शिवच त्या लिंगात प्रगटला होता..असं म्हणतात अध्यात्म हे अनुभवाचे शास्त्र आहे, हे अगदी खरंय! चराचरात व्याप्त परमात्मा जेंव्हा शिवलिंगात एकाकार होतो ती रात्र म्हणजेच महाशिवरात्र! ती शिवकृपेने अनुभूती मिळाली ही या पवित्र पर्वाची सफलताच!
" हे ज्योतिर्मय शिव भास्करा, करूणाकरा, तू करूणानिधानच आहेस, भक्तवत्सलही आहेस..तुझ्या ज्ञानरूपी तृतिय नेत्राने अज्ञानाचा अंधःकार नाहीसा कर व या चराचराचे तुझ्या सत्चिदानंदरूपाने कल्याण कर." हर हर महादेव।नमः शिवाय।।
Comments
Post a Comment