#प्रेम
- सौ. स्वरूपा कुलकर्णी
प्रेम...
म्हंटलं तर भावना...
म्हंटलं तर पवित्रता..
किंवा त्याग...
अद्वैत..
समर्पण..
आनंद..
अस्तित्व..
जीवन...
खरं तर प्रेम ही अनुभवण्याची, अनुभूतीची गोष्ट आहे..कितीही सांगून, मोठ मोठी ग्रंथसंपदा धुंडाळूनही शिल्लकच राहाते अशी गोष्टं आहे.. ज्याला प्रेम या गोष्टीची अनुभूती आली त्याचे जगणे नक्कीच वेगळे असते..चारचौघांसारखेच पण निराळे..जेंव्हा जगण्यात प्रेम येते तेंव्हा कधीकधी आकर्षणाचे रूप भासते..कधी कधी तर ओळखणेही शक्य नसते..पण आकर्षण, आभास, त्रास, दुःख, विरह, वेदना यापलिकडे जाऊन प्रेमाचं एक मोठं व वेगळं अस्तित्व आहे..जसजसे तुम्ही आत आत खोल जाता प्रेमही त्यांच्या विविध रंग- ढंगात तुम्हाला खोल नेत रहाते..जितकं समृद्धं तुमचं प्रेम तितकीच समृद्ध जगण्यातली समज..प्रेम ही भव्य ईश्वरी चेतनाच आहे..किंवा ईश्वराचं गहिरं, परिचीत तरीही अपरिचीत स्वरूप म्हणजे प्रेम! मैत्री, प्रेम ही जुळी भावंडं..पण प्रेम अधिक आश्वासक, परिपूर्ण, परिपक्व, समंजस, लाडकं, विशाल व भव्य! मैत्री सकस, समृद्ध, जीवंतपण देणारी, बरीचशी विश्वास देणारी गोष्टं..मैत्रीतुनच प्रेम विकसित होत जातं हेही खरंय..वरवरचे आकर्षणाचे पुटं निघून गेले की उरतं ते खरं , सत्य व साधं तरीही प्रेमाचं विराट रूप ..ज्याला कोणतंच लेबल किंवा उपाधी मानवत नाही..ते divine असतं..दैवी असतं..पती पत्नी संबंधात प्रेम भूलभूलैय्या निर्माण करतं..पण वय परिपक्व झालं किंवा आंतरीक प्रेमाची चाहूल लागताच दोघंही एकरूपतेकडे वाटचाल करायला लागतात..मग वरवरचं कौतूक, आकर्षण, शृंगार, प्रणय यापल्याड सापडतं ते दोन्ही मनं एकरूप, एकतान,एकह्रदय झालेली..वेगळं वाटणंच संपून जातं.."तो" ते समजू शकतो जे "ती" सांगू शकत नाही..अशी आंतरीक स्थिती होते तेंव्हा प्रेम करणे ही कृती न रहाता अवस्था होते..जगणंच प्रेम होते..ईश्वर कळतो..ही अनुभवण्याची गोष्टं आहे..समजावण्याची नाहीच मुळी..कृत्रिम प्रेमाचा शृंगार काळापरते नष्टंच होणार पण प्रेम त्याही पलिकडचं असतं..निर्लोभ, निष्काम, नि:संशय शाश्वत व परेच्याही पलिकडे नेणारं दैवी,उंच खूप उंच, क्षितीजाच्याही पलिकडे गवसणी घालणारं, नेणिवेच्याही पल्याड साक्षात आत्म स्वरूप दाखवणारं दिव्य अस्तित्वं..प्रेम म्हणजे ...बस्स इतकंच!😊
Comments
Post a Comment