कृष्णप्रिती


-सौ. स्वरूपा कुलकर्णी


निळसर जळात झुकते आभाळ काळे सावळे,

जणू रजनीने सोडले हलके केस तिचे मोकळे


मधुनच वारा मंद शांत तो सहजच पाती हलवी,

संथ लयीतुन दीर्घ क्षणांनी पावा स्वर आळवी


निरांजनीला सूर गर्भित अंगणात स्निग्ध पोचवी,

नितांत सुंदर कृष्णमंजिरीला जणू काही सुचवी


रात्रीचे ते सुर अनामिक चंद्र नभातुनी गहिवरतो,

रुसलेल्या राधेला पहाण्या कृष्ण जळांत उतरतो


ती उभी भरूनी घागर यमुना काठी मुग्धं,

हसले चिरंतन स्वप्न जगाचे तिच्या समोरी धूंदं


तिला पाहुनी कृष्णमुरारी झाला अतीहर्षित,

रुसवा क्षणात विसरूनी राधा मिठीत त्याच्या धुंद


पुनःपुन्हा तो पाही तिजला अतिप्रेमाने स्नेहाने,

तिही विसरून रूसवा सारा प्रितीने बावरे


राधा लाजे अती प्रेमाने कृष्णसख्याच्या येण्याने,

पाहुनी सुखद दृश्य साजिरे जग सारे मोहिले


यमुनेच्या तीरावर झाली कृष्णसख्याशी भेट,

पावा अजुनी घुमत रहातो गीत प्रितीचे सार्थ


मन्मथ ह्या संपूर्ण सृष्टीचे राधा-कृष्णात गुंफते,

 जीवाशिवाचे ऐक्य इथे दृश्यमान होते

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न