सद्गुरूकृपा
©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी
ज्याला ईश्वराविषयी कुतूहल आहे त्याने नक्की सद्गुरूंकडे जावं. खरं तर सद्गुरूच अशा मुमूक्षाकडे वाट काढत येतात. कारण, मी संसाररूपी मायाबंधनात आहे हे आधी ज्याला जाणवते त्याच्यावरच सद्गुरूकृपा होते.
जग क्षणभंगूर आहे, इथे मिळणारं सुख असो वा दुःख दोन्हीही क्षणापुरतेच. या जगात असलेल्या प्रत्येक वस्तूचा एक ना एक दिवस नाश होणार हे नक्की. जगात होऊन गेलेल्या मोठमोठ्या विभूतिही काळाच्या ह्या विशाल पडद्याआड निघून गेल्या. मग शेवटी उरणार काय ? तर काहिच नाही. फक्त एकच एक परब्रह्म !! जे डोळ्यांनी दिसत नाही पण ते सर्वत्र व्याप्त आहे. कणा कणात आहे. स्वयंभू आहे. त्याचा कोणी मालक नाही. त्याला जन्म नाही, म्हणून मृत्युही नाही. तो अव्यक्त, सनातन, सर्वांचा मायबाप असा सर्वशक्तीमान, सच्चिदानंदघन परमात्माच कायम रहातो. हे आत्मानुभूतीद्वारे ज्याक्षणी साधकाला कळते तत्क्षणी चर्मचक्षूंशिवाय ज्ञानचक्षूद्वारे आत्मा हाच परमात्मा हे तत्व लक्षात येते. परमात्मा गुप्त आहे किंवा रहस्य आहे हे संसार मोहपाशात अडकलेला बद्ध जीव म्हणेलच. पण सखोल चिंतन व सद्गुरूकृपा लाभली तर हे आत्मज्ञान लवकर होते. मी म्हणजे नश्वर देह नव्हे, मी म्हणजे कोणी संपणारा नव्हे किंवा साधा मनुष्य नव्हे. तर मी " तो" आहे. तो म्हणजे परब्रह्म किंवा सद्वस्तू आहे.ती सद्वस्तू संपूर्ण विश्व व्यापून उरलेली चैतन्यमयी, स्वयंप्रकाशीत खूप मोठी उर्जा आहे. तिच्या अस्तित्वाने संपूर्ण ब्रह्मांड व्याप्त आहे. ती नाही अशी कुठलीच जागा नाही. वर - खाली, मागे- पुढे तीच ती आहे. हे ज्ञान आत्मसाक्षात्कार झालेली व्यक्ती प्राप्त करते.
परमात्मा समजुन घेतांना मग सद्गुरू कशाला हवा असा प्रश्न मनात येईल. पण या भवसागरात नाव असेल पण नावाडीच नसेल तर नाव पुढे जाणार कशी? परब्रह्म सर्वत्र आहे पण मला कसे दिसेल हे सद्गुरूच शिष्याला सांगतात. सद्गुरूंच्या कृपाप्रसादानेच शिष्य मायेच्या विळख्यातुन शिष्याची सुटका करतो.
खरं तर माया म्हणजे काय ? तर अज्ञान. हे अज्ञान म्हणजे काय? तर परब्रह्म सर्वत्र व्याप्त असुनही त्याला विसरणे किंवा त्याला शोधायला जाणे. जो इथेच ह्रदयातच आहे त्याला बाहेर शोधणे. हातात कळसा व गावाला वळसा अशी स्थिती.हे अज्ञान! अशी आंधळ्यासारखी परिस्थिती झाल्यावर सद्गुरूच आपले ज्ञानचक्षू उघडतात व त्या सर्वांग सुंदर, परिपूर्ण, स्वयंप्रकाशीत शुद्ध चैतन्याचं परमात्म्याचं दर्शन करवतात. ही सद्गुरूकृपाच आपल्या सांसारीक अज्ञान बंधनातून मूक्त करते.
एकदा सद्गुरूकृपा झाली की पुढे काही मागावं लागत नाही. जर अखिल ब्रह्मांडाचा नायकच गवसला तर फुटकळ मायिक चिजवस्तूंनी काय मिळणार. तो अखिल विश्वाचा नायक समोर भेटल्यावर सर्व ईच्छा क्षणात विराम पावतात. भक्तिची गंगा ह्रदयात वाहू लागल्यावर इच्छा शेष राहूच शकत नाही. बस्स तूच तू , मी वेगळा उरत नाहीच. माया संपते. परब्रह्मच उरतं.. अशी ही सद्गुरूकृपा ज्याच्यावर होते त्या सज्जनांचे आयुष्य उजळून जाते व मोक्षलक्ष्मी प्रसन्न होते. सद्गुरू हेच ते मोक्षदाता .. आपले नावाडी.. त्यांचा विसर कधी पडू नये. तरच जीवन सफल झाले असे म्हणता येईल.
Comments
Post a Comment