"अव्यक्त भावनांचं पत्र" 


लेखिका-सौ.स्वरूपा कुलकर्णी

      

प्रिय तीर्थरूप दादा(आजोबा),

            साष्टांग नमन.

         मला आज खूप मनापासून वाटलं की ती व्यक्ती तुम्हीच आहात ज्यांच्याशी मनातलं खूप काही बोलायचं राहून गेलं.मी तुमच्याशी कधिही बोलू शकले नाही ते बोलणार आहे.देवाच्या कृपेने तुम्हाला ९२ वर्षाचे खूप मोठे व चांगले आयुष्य लाभले.तुमची देवभक्ती, सद्गुरूनिष्ठा फळाला आली व एकादशीलाच तुम्हाला मुक्ती मिळाली.मी तेंव्हा फार मोठी नसले तरी हे कळण्या इतपत मोठी होते की तुम्ही वैकुंठाला गेले...जणू देवानेच तुम्हाला बोलावून घेतलं.खरंच तुम्ही सगळं जिंकलंत....आमच्यावर तुम्ही अमीट अशी छाप सोडून गेलात..

      मला आठवतं तुमची दिनचर्या जवळ जवळ ९० वर्षांपर्यंत सारखीच होती.सकाळी लवकर उठणे, आंघोळ, देवपूजा, देवदर्शनाला जाणे, न्याहारी, मग दुपारी ठरावीक वेळेत जेवण, दुपारी चहा मधल्यावेळेत जप, सतत कार्यमग्न राहून तुम्ही आमचे कायम आदर्श राहिलात.रात्रीचे जेवणही ठरावीक व मोजके.तुम्ही फार कधी आजारी पडल्याचं आठवत नाही.तुमची काटक,कणखर देहयष्टी आमच्या सर्वांच्या कौतूकाचा विषय होती.

       दादा, तुम्ही आता फिरून परत कधी येणार नाही पण मनाने आम्ही ही गोष्ट मानतच नाही.उलट तुम्ही सर्व परिस्थीतीत आमच्या सोबत सतत आहातच हे जाणवत रहाते.तुमचे श्राद्धकर्म करतांनाही आई- बाबांना व आम्हाला तुम्ही आमच्यापासून कधी दूर गेलात असे बिलकूल वाटत नाही.तुम्हाला तुमच्या घरदाराची,मुला माणसांची इतकी काळजी होती पण म्हणून तुम्ही आमच्यात व्यर्थ गुंतले नाही हे खरंय. पण संस्कारांनी उभ्या केलेल्या या तुमच्या हाडामासांच्या मुलामाणसांची तुम्ही आजही तुमच्या उच्च विचार व जीवनमुल्यांनी कायम सोबत केलीये.मला तुमची आठवण आली की कायम देवाचे स्मरण होते.दादा, आता तुम्ही देवाजवळ गेलात.पण आम्ही सगळे तुमची नेहमी आठवण काढतो.तुम्ही आम्हाला आर्थिक व नैतिकदृष्ट्या बळकट केलंत त्यामुळे कधी लाचार झालो नाही.उलट उत्कर्ष करत राहिलो. 

        तुमची नात म्हणून तुम्ही माझ्यावर केलेले अमिट संस्कार मी कधी कधी विसरू शकत नाही.मला लाभलेले हे घरंदाजपणाचे, आदर्श नितीमुल्यांचे संस्कार केवळ अनमोल आहेत.तुम्हाला हे पत्र लिहून खूप खूप ऋण व्यक्त करायचं होतं.दादा, तुमच्यामुळे माझा,भैय्याचा संसार सुखाचा चालूए.माझं सासर उत्तम आहे.तुम्ही असता तर तुमच्या पणत्यांचं खूप कौतूक केलं असतंत.आई व बाबा तुमच्या आठवणीत कायम  असतात.तुमच्या दोन्ही मुली सुखात आहेत.तुम्ही अगदी निश्चिंत असा.तुमची माया व प्रेम आजही आमच्यात दरवळते आहे.तुम्हाला आठवणार कसे ?जर कधी विसरलोच नाही.

     तुम्हाला परत एकदा कोटी कोटी नमन!!

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न