# एक_पत्र_कृतज्ञतेचं
प्रिय लतादिदी,
शिरसाष्टांग नमस्कार🙏
सर्वप्रथम सांगते,तुझी आठवण आली नाही असा एकही दिवस नाही.जणू विधात्याने तू स्मरणकोषातुन दूर जाऊच नये अशीच तुझ्या आवाजाची घडण केली होती.हो केली होती म्हणतीये पण दिदी, तूझा आवाज तुझ्यासारखाच अमर झालाय.सतत कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात ते तुझे दैवी स्वर निनादतच असतात.तू देवाने घडवलेला अप्रतिम नजराणाच.कानांची, मनाची, ह्रदयाचीही तृप्तता तुझ्या स्वरांनी केली. तू स्वर लावलास की शुद्धता,मांगल्य, पवित्रता असा निखळ दैवी आविष्कार ऐकत,अनुभवत आलोय.तुझा आवाज सामान्य नव्हताच..पण तुझं साधं रहाणं, सच्चाईने गाणं, समोरच्याच्या ह्रदयाचा सहज ठाव घेणं खरंच कोणाला जमलच नाही.तुझे नक्षत्रांसारखे हे दैवी देणे आम्हाला भरभरून मिळाले.पण एका कृतज्ञतेशिवाय आम्ही तुला आज काही देऊ शकत नाही.तू देवाघरी गेलीस पण तुझ्या दैवी स्वराने आजही आमच्यातच आहेस.फुलातल्या सुगंधासारखी दरवळते आहेस.तुझ्या सरस्वतीच्या रूपाला मी मनापासून वंदन करते दिदी.तूझं मोठ्यात मोठेपण कितीतरी काळ नांदत होतं व राहील पण शरीराने तू दूर गेलीस हे शल्य राहिलंच.कारण,तुला कधितरी भेटायचं होतं.तुझा चरणस्पर्श करायचा होता.तुझ्या वलयांकित छबीला जवळून न्याहाळायचं होतं.तुला तूझा स्वर ऐकल्यावर होणारी मनाची अवस्था सांगायची होती.तुझं साधेपण, विनोदी स्वभाव, शांताबाईंशी मैत्री याबद्दल भरभरून बोलायचं होतं.किती किती थोर उपकार तुझे नी तुझ्या कुटूंबीयांचे हे मनापासून बोलायचं होतं, पण ते राहूनच गेलं..मी एक सामान्य भक्त आहे तुझा माहितीये मला. तेव्हडा कोणी मोठा नाही की तुझी ओळख होऊन पाया पडता येईल पण मनात राहून राहून तुझ्याविषयी असलेली कृतज्ञता कशी व्यक्त करायची हे ठसठसत होतं.आज त्याला शब्दरूप देते आहे..
दिदी, परत जन्म घेशील?परत त्या नाजूक,तरल,रेशमी स्वरात गाशील? आम्हाला तुझ्या स्वरातली ती सच्चाई परत अनुभवयाचीये गं.गाणं गातांना तुझ्या सत्शीलतेच,सात्विकतेच अभंग स्वरूप आम्ही दुरून अनुभवलं खरं..पण परत येशील का गं? आमच्यासाठी? दिदी , तू स्वरगंधर्व होतीस..स्वर्गातही देव तुझ्या दैवी स्वरात चिंब चिंब नहात असेल.मनाच्या गाभाऱ्यात ज्या दैवी गोष्टींची सदैव पूजा होते आहे त्यात तूझा स्वर कायमच निनादत रहील.तू देवासारखीच पूजली जाणार दिदी..तूझे स्थान ध्रूवासारखे अचल, अभंग आहे.भारतीय संगितात तूझे नाव घेतल्याशिवाय महान गायकांची ओळख अपूर्ण आहे.तू संगितातला एक तपस्वी, शुद्ध स्वर! हिमालयातील स्वर्गिय गंगेचे जलावतरण म्हणजे लताचा सुर! जो आमचे ह्रदय पवित्र, शुद्ध करायला खळखळत खाली आला.त्याने आम्हाला पवित्र केलं.खरंच तू पवित्र गंगाच!स्वतः परमात्म्याने स्वर्गातून पाठवलेली स्वरयोगिनी! तूझी गानतपस्या फळली म्हणूनच तू आमच्या अनेक पिढ्यात स्वररूपाने चिरंजीव झालीस. सरस्वतीची छबी तुझ्यासारखीच मानतो आम्ही.
' निज माझ्या नंदलाला' ही अंगाई असो की' ये जवळी घे, जवळी प्रिय सखया भगवंता' हेही तितकच दैवी. ' मोगरा फुलला' तुझ्यासारखं कोण गाणार?' हिंदी गाणी तर तू हजारो गायलीस.एकाहून एक सरस.९० सालची तुझी गाणीही सुपरहीट झाली.आमच्या मागच्या पिढ्या तर तूझी गाणी ऐकतच मोठ्या झाल्या.तशी आमचिही पिढी दैवयोगाने तुला ऐकतच मोठी झाली.रेडिओवर लहानपणी ऐकलेलं' चाफा बोलेना', ' आनंदी आनंद गडे'सगळेच संस्मरणीय..तू गायलेलं ' ऐ मेरे वतन के लोगो' तर अखिल मानवी जगाने शूर शिपायासाठी वाहिलेली ती श्रद्धांजलीच आहे.डोळ्यात पाण्याची धार लागावी अशीच गीते तू गायलीस..तूझं सहजपणे सूरावटी गळ्यातून चपखल फिरवणं हे ' लता स्पेशल' समजलं जातं.ते तूच करो जाणे.
आज टेक्नॉलॉजीमुळे तूझा आवाज रेकॉर्ड झालाय.तीच आमच्या पुढिल पिढ्यांची शिदोरी कि असाही स्वर कोणी गायलाय..कोणी इतकं मधूर, दैवी गायचं..तू काळाच्याही पुढे आपलं स्थान पक्क केलंस.आम्ही तुझे चिरकाल ऋणी राहू..तू परत ये ..दिदी तू परत ये..आमच्या ह्रदयीच्या जखमांना हळूवार फुंकर घालायला..तूला हे पत्र लिहितांना डोळे झरझर झरलेत..तुझ्या दैवी प्रवासातले कितीतरी क्षण मन गाभाऱ्यात कोंदले..तू देवताच होतीस हे मन आज मुकपणे पुनःपुन्हा मान्य करतंय..तू चिरंजीव आहेसच फक्त आमच्यासारख्या मर्त्य जगातल्या जडजीवांना उद्धरून नेण्यासाठी तू आली होतीस..तूला मनातील कृतज्ञतेचे हे चार शब्द तर्पण करते..नमामी देवी सरस्वती, शारदे🙏
Comments
Post a Comment